शारिरिक व्यायाम आणि मानसिक व्यायाम
प्रसिद्ध धावपटु आणि आॅलिंपिक पदक विजेते श्री. मिल्खा सिंग यांच्या मते, आपल्या शरिराला व्यायामाची तितकीच गरज आहे, जितकी खाण्यापिण्याची. परंतु, तो करायला आपल्याला इतका आळस, की आपण साधे सूर्यनमस्कार तर सोडाच, साधा चालण्याचा व्यायामही करत नाही.
ठीक आहे, परंतु आजच्या प्रचंड धकाधकीच्या, धावपळीच्या, अनिश्र्चिततेच्या आणि स्पर्धेच्या काळात मनावर प्रचंड ताण येऊन नकारात्मक आणि भितीच्या वातावरणाने ते आजारी पडु शकते. अशा वेळी सकारात्मक संकल्प आणि स्वयंसुचनांचा उपाय प्रभावी ठरु शकतो. तोच मनाचा व्यायाम आहे.
योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे गुरुजी (अण्णा) म्हणत,
, "आनंद हा सगळीकडे भरलेला आहे. पण तो बघण्याची आपली वृत्ती नाही, आणि तशी आपली दृष्टीही नाही." त्यांच्या शवासनात ते एक सकारात्मक संकल्प देत.
संकल्प पुढीलप्रमाणे -
"प्रचंड आत्मविश्र्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे.मला खुप बरं वाटतंय, अगदी हलकंहलकं, मोकळंमोकळं, ताजंतवानं, टवटवीत, एकदम फ्रेश…..आणि हा हलकेपणा, ताजेपणा, ही टवटवी हा जोम, हा उत्साह आयुष्यभर टिकणार आहे. येथुन पुढे मी माझं आयुष्य मी आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करणार आहे."
हा संकल्प आपण जेव्हाजेव्हा मनात नकारात्मक, नैराश्याचे आणि भितीचे विचार येतील, तेव्हा म्हणु शकतो आणि ते विचार झटकुन टाकु शकतो.
स्वयंसुचनांना कमी लेखु नका. वारंवार घेतल्या गेलेल्या स्वयंसुचना हळुहळु आपल्या अंतर्मनात जातात आणि प्रचंड पटीने सामर्थ्यशाली बनतात, हे तत्व प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जोसेफ मर्फी यांनी आपल्या 'The Power of Your Subconcious Mind' या आपल्या पुस्तकात सिद्ध केले आहे.
त्याच तत्वाचा वापर करुन श्री. वामनराव पै यांनी त्यांच्या 'तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या पुस्तकात विश्र्वकल्याण प्रार्थना मांडली आहे. या प्रार्थनेत भौतिक संपत्तीबरोबरच सुखशांतीसारखी मानसिक संपत्तीही मागितली आहे. मुळात कोणतीही प्रार्थना ही एक स्वयंसुचनाच असते आणि ती केल्यावर त्या प्रार्थनेला अनुकुल विचार आपल्या मनात येऊ लागतात आणि तशी कृती आपल्या हातुन घडु लागते. प्रार्थना पुढीलप्रमाणे -
" हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे.
सर्वांना सुख, शांती, संपत्ती दे.
सर्वांना धनधान्य समृद्धी दे.
सर्वांना आनंद, आरोग्य, ऐश्वर्य दे.
सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, आणि
तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे."
हे सकात्मक संकल्प आणि प्रार्थना, याच मनाला सुदृढ ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम आहेत. त्या दररोज ( जमल्यास शारिरिक व्यायामही) कराव्यात आणि स्वतःला आनंदी आणि चिंतामुक्त ठेवावे.
Comments
Post a Comment